- जन्म: ११ नोव्हेंबर १८८८
- मृत्यू : २२ फेब्रुवारी १९५८
- पूर्ण नाव : मोहिउद्दीन अहमद खैरुद्दीन बख्त
- वडील : मौलाना खैरूद्दीन
- आई : आलिया बेगम
- जन्मस्थान : मक्का
- शिक्षण : अधिकतर शिक्षण घरीच झाले. इ.स. १९०३ मध्ये ‘दर्स-ए-निजामिया’ ही फारसी भाषेतील परीक्षा उत्तीर्ण होऊन ‘अलीम’ हे प्रमाणपत्र मिळविले.
- विवाह : जुलेखा बेगमसोबत (इ. स. १९०७ मध्ये).
कार्य
इ.स. १९०६ मध्ये मक्केतील मुल्ला-मौलवींनी त्यांचा सत्कार केला तेव्हा ‘अबुल कलाम’ ही पदवी देण्यात आली.
‘अबुल कलाम’ याचा अर्थ ‘विद्या वाचस्पती’ असा होतो. आझाद हे त्यांचे टोपणनाव: ते त्यांनी लिखाणासाठी घेतले होते. आपल्या लिखाणात उर्दू काव्याच्या शेवटी ते ‘आझाद’ या नावाचा वापर करीत.
अशा पद्धतीने मौलाना आझादांची मूळची नावे मागे पडली आणि मौलाना आझाद या नावाने ओळखले जाऊ लागले. ‘आझाद’ हे नाव लिहिण्यामागे त्यांची जुन्या बंधनातून मुक्त होण्याची प्रेरणा होती.
इ. स. १९०५ मध्ये आझादांच्या वडिलांनी त्यांना मध्य आशियात पाठविले.
मौलाना आझाद यांनी इराण, इजिप्त, सीरिया, तुर्कस्तान इत्यादी देशांना भेटी दिल्या. अन्य त्यांनी कैरो येथील ‘अल-अझर’ विद्यापीठाला भेट दिली. तसेच ते योगी अरविंदाना जाऊन भेटले व ते एका क्रांतिकारी गटात सामील झाले होते परंतु नंतर त्यांनी ह मार्ग सोडून दिला होता.
कारण क्रांतिकारकांचे गट मुस्लिमविरोधात क्रियाशील होते, असा अनुभव आझादांना येत होता.
मुस्लिम हे ब्रिटिशांचे हस्तक आहेत,असाही समज त्या वेळी मोठ्या प्रमाणात पसरलेला होता.
इ. स. १९१२ मध्ये मौलाना आझादांनी कलकत्ता येथे ‘अल् -हिलाल’ हे उर्दू वृत्तपत्र सुरु केले होते. त्यात त्यांनी ब्रिटिशविरोधी भूमिका घेतली होती.
तसेच भारतीय मुसलमानांच्या विटिश निष्ठेवर टीका केली होती. त्यामुळे सरकारने इ.स. १९१४ मध्ये ‘अल हिलाल’ वर बंदी घातली परंतु पुढे इ.स. १९१५ मध्ये ‘अल-बलाग’ या नावाचे दुसरे वृत्तपत्र त्यांनी सुरू केले होते.
इ.स. १९२० मध्ये दिल्ली येथे आल्यावर त्यांनी महात्मा गांधींची भेट घेतली होती आणि त्यांनी काँग्रेसचे सभासदत्व स्वीकारले होते.
मौलाना आझादांनी महात्मा गांधीजींच्या असहकाराच्या चळवळीत भाग घेतल्यामुळे आणि ब्रिटिश शासनाच्या विरोधात भाषण केल्यामुळे त्यांना १० डिसेंबर, १९२१ रोजी अटक करण्यात आली होती आणि नंतर दोन वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागली होती.
मौलाना आझादांनी हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी केलेले कार्य लक्षात घेऊन त्यांची इ. स.१९२३ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.
भारतीय मुसलमानांत राष्ट्रीय भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसअंतर्गत राहून कार्य करण्यासाठी इ.स. १९२९ मध्ये ‘नॅशनल मुस्लिम पक्षाची ‘स्थापना करण्यात आली होती आणि त्याचे अध्यक्षपदही मौलाना आझादाकडे सोपविण्यात आले होते. या पक्षाने मुस्लिम लीग सारख्या जातीय संघटनेला विरोध केला. संमिश्र राष्ट्रवादावर त्यांची श्रद्धा होती.
इ.स. १९३० मध्ये सविनय कायदेभंगाच्या चळवळीत ते स्वतः उतरले होते. तसेच त्यांनी इतर भारतीय मुसलमानांना कायदेभंगाच्या चळवळीत सहभागी व्हायला प्रवत्त केले होते. मौलाना आझादांचे या चळवळीवरचे नेतृत्व आणि प्रभुत्व लक्षात घेऊन ब्रिटिश शासनाने आझादांवर अनेक प्रांतांत प्रवेशबंदी केली होती.
इ.स. १९४० मध्ये आझाद पुन्हा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झाले. १९४६ पर्यंत ते त्या पदावर होते.
इ. स. १९४२ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे मुंबई येथे भरलेल्या ऐतिहासिक अधिवेशनाचे मौलाना आझाद अध्यक्ष होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली ‘छोडो भारत’ चा ठराव मंजूर केला होता.
इ.स. १९४६ मध्ये कॅबिनेट मिशनशी चर्चा करीत असताना मौलाना आझादांनी वेगळ्या पाकिस्तानच्या मागणी कसून विरोध केला. वेगळ्या पाकिस्तानमुळे प्रश्न सुटणार नाही, उलट प्रश्नाचा गुंता वाढेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
इ.स. १९४७ ला पं. नेहरूंनी अंतरिम सरकार तयार केले होते. त्यात आझादांचा शिक्षणमंत्री म्हणून समावेश झाला होता. मृत्यूपावेतो ते त्या पदावर होते.
ग्रंथसंपदा
इंडिया विन्स फ्रीडम (आत्मचरित्र), दस्ताने करबला, गुब्बा रे खातिर, तजकिरह इत्यादी.
पुरस्कार
इ. स. १९९२ मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ (मरणोत्तर).
मृत्यू
२२ फेब्रुवारी १९५८ रोजी त्यांचे निधन झाले.