How to Write Essay – निबंध कसा लिहावा
कुठल्याही स्तरावर भाषा शिकताना, प्रश्नपत्रिका सोडवताना कमी-अधिक लांबीचा निबंध लिहिणे अनिवार्य असते. एखादा विषय कितपत समजला आहे. स्वतःच्या भाषेत त्यावर मुद्देसूद विचार मांडता येत आहेत का, गोंधळून न जाता विषयानुरूप विचार, मते, प्रसंग, भावना यांचे वर्गीकरण करून ते क्रमवार, सुसूत्रपणे उलगडता येत आहेत ना; हेच निबंधातून पाहिले जाते.
स्पर्धा परीक्षांसाठी निबंध लिहिताना अर्थातच निबंध लेखनाची काठिण्यपातळी वाढत जाते; वाढत जायला हवी. शिक्षणामुळे अनुभवाकडे पाहण्याची आपली दृष्टी प्रगल्भ बनत असते, जाणिवा समृद्ध होत असतात, वृत्ती डोळस बनत असतात.विचारांनाही नवी झळाळी मिळत असते. त्यामुळे या सगळ्याचे प्रतिबिंब आपल्या निबंधातूनही उमटायला हवे.
त्यामुळेच एकाच विषयावरचा शालेय पातळीवरचा निबंध आणि स्पर्धा परीक्षांमधला निबंध यात जमीन-अस्मानाचा फरक हवा. शिवाय, स्पर्धा परीक्षांमधून उत्तीर्ण होऊन पुढे तुम्हाला प्रशासकीय सेवेत रूजू व्हायचे असते. अशावेळी परिस्थितीचे नेमके आकलन, समस्येचे गांभीर्य, त्याबद्दलची मतमतांतरे, उपाययोजना, त्यावरचे स्वतःचे स्पष्ट मत, याविषयीचे चौफेर भान असायला हवे असते. निबंध लेखनातून टप्प्याटप्प्याने, तर्कसंगत मांडणीतून एखाद्या निर्णयापर्यंत का आणि कसे जायचे याचेही भान तुम्हाला यानिमित्ताने यावे, ही अपेक्षा असते.
निबंधलेखनामध्ये आत्माविष्काराला मोठा वाव असतो. विचारांतील तर्कशुद्धता, शब्दांवरची हुकमत, कमी वेळात सुव्यवस्थितपणे मांडलेले विचार, वाचन, बहुश्रुतता अशा अनेक पैलूंचे दर्शन घडविण्याची संधी निबंधातून मिळते.जणू आपले व्यक्तिमत्त्वच निबंधातून प्रकट होते. विचार सुचण्यासाठी अनुभव उत्कटपणे घेण्याची आवश्यकता असते. तीच गोष्ट सूक्ष्म निरीक्षणाची. आपल्या पंचेंद्रियांचा उपयोग जागरूकपणे करायला हवा.
काही अनुभव आपण प्रत्यक्ष घेतो, तर काही वाचनातून मिळवता येतील. विविध प्रकारच्या वाचनातून आपल्याला विचारांचा, कल्पनांचा खजिनाच हाती लागतो. त्याचा निबंधलेखनासाठी कसा उपयोग करता येईल, याचा थोडा विचार
करूया.
कोणत्याही प्रकारच्या निबंधाचे मुख्यतः दोन भाग पडतात.
1) पहिला भाग म्हणजे त्या निबंधाचे मुद्दे किंवा त्याचा आशय
2) दुसरा भाग म्हणजे त्या आशयाची मांडणी म्हणजेच निबंधशैली.
निबंधाचा आशय आणि शैली या दोन्ही दृष्टीने जो निबंध उंची गाठू शकतो, तो उत्तम ठरतो. मुद्दे चांगले आहेत; पण मांडणी ढिसाळ, अनाकर्षक असेल, तर निबंध सकस पण बेचव, कंटाळवाणा होईल आणि नुसताच भाषेने, अलंकारांनी सजवलेला पण ठोस आशय नसलेला निबंध खमंग, पण निःसत्त्व ठरेल.
जेव्हा आपण निबंधाचा विषय वाचतो. तेव्हा त्या विषयाशी संबंधित अनेक विचार, कल्पना, अनुभव, आठवणी,प्रसंग आपल्या मनात गोळा होतात. या सगळ्यातून निबंधासाठी कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत व कोणते गाळले तरी चालतील, हे निबंधाची शब्दमर्यादा लक्षात घेऊन ठरवायला हवे; कारण निबंधासाठी असलेली शब्दमर्यादा पाळणे या आवश्यक असते.
त्यामुळे कोणत्या मुद्दयाचा सविस्तर विचार करायचा व कोणते थोडक्यात मांडायचे, ही दोन्ही आत्मसात करायला हवीत. अर्थात, त्यासाठी सराव महत्वाचा. निबंध लिहिताना निवडलेल्या मुक्ष्यांचा क्रम डोळ्यांपुढे आणून एकातून एक विचार, कल्पना उलगडत जातील, या पद्धतीने या मुद्यांची संगती लावायला हवी निबंध वाचताना त्यातील सलगता जाणवायला हवी.
निबंधाचा दुसरा भाग म्हणजे निबंधाची मांडणी, शैली! आपले विचार, भावना, समर्पक व मोजक्या शब्दांत व्यक्त करता यायला हव्यात.
शब्दरचना व वाक्यरचना जमण्यासाठी विशेषणे, क्रियाविशेषणे, वाक्प्रचार, म्हणी, सुभाषिते, सुविचार यांचे भांडार आपल्याजवळ भरलेले हवे. अवांतर वाचन केलेले असले की, आपल्याबीनिबंधातील आशय ची समृद्धी तर वाढतेच; पण वेगवेगळे लेखक कसे शब्द वापरतात, कशी मांडणी करतात, याच्या परिचयातून आपली स्वतःची शैली विकसित होत जाते.
आवश्यक असे शब्द सहजपणे कागदावर उमटू लागतात. यासाठी वाचनाची साधना हवीच! अवांतर वाचनामध्येही सातत्य व विविधता असायला हवी. दैनंदिन वृत्तपत्रांमधील बातम्यांबरोबरच माहितीपूर्ण, वैचारिक लेख, पुस्तकांमधील चरित्रे, प्रवासवर्णन, ललित निबंध, इतिहास, वैचारिक साहित्य असे विविध प्रकारचे साहित्य वाचायला हवे.
समस्याप्रधान निबंध लिहायचे असतील तर, आपल्या देशाच्या, समाजाच्या स्थितीचा अभ्यास वृत्तपत्र वाचनातून व्हायला हवा. त्याचबरोबर जे वाचले त्याची नोंद करून ठेवायला हवी. निबंधाच्या विषयाशी संबंधित नुकत्याच घडलेल्या घटनांचे संदर्भ देता यायला हवेत. आपले विचार, आपल्याला सुचलेल्या कल्पना टिपून ठेवायला हव्यात.
वाचलेली सुभाषिते, काव्यपंक्ती यांचा वापर योग्य प्रमाणात करायला हवा. अन्यथा विषयाला कृत्रिमता येते. विषयाच्या संदर्भात सर्वसामान्य विचारांबरोबरच आपला खास वेगळा ठसा उमटवणारा मजकूर त्यात आला, तर असा निबंध खूप परिणामकारक ठरू शकतो.
निबंधाच्या मांडणीशी संबंधित अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निबंधाची आकर्षक, योग्य सुरुवात आणि सकारात्मक समारोप!
वेगळा ठसा उमटवणारा मजकूर त्यात आला, तर असा निबंध खूप परिणामकारक ठरू शकतो. निबंधाच्या मांडणीशी संबंधित अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निबंधाची एखाद्या प्रसंगातून नुकत्याच घडलेल्या एखाद्या घटनेचा संदर्भ घेत; निबंध विषयासंबंधात कुतूहल जागे होईल, निबंध वाचायची उत्कंठा निर्माण होईल, अशी निबंधाची सुरुवात असावी.
पण ‘नमनालाच घडाभर तेल अशी अवस्था होत नाही ना, याबद्दल जागरूक असावे.
सुरुवातीची चांगली कल्पना किती तपशीलवार मांडायची. ?
निबंधाची शब्दमर्यादा लक्षात घेऊन ठरवावे, निबंधाचा शेवट करतानाही आशादायी, समस्या निवारणाच्या दिशेने जाणार उपाययोजना सुचवणारा, भविष्याबद्दल मंगल चित्र रंगवणारा असावा, समस्या किती का असेना, ती निवारण्याचे बळ तुम्हा तरुणाईच्या मनगटात नक्कीच आहे, हे निबंधातून जाणवायला हवे. या विभागाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रस्तावना.