ग्रामपंचायत बद्दल संपूर्ण माहिती : Gram Panchayat Mahiti Marathi Language
ग्रामपंचायत बद्दल संपूर्ण माहिती : १) मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कायदा – 1958 कलम 5 मध्ये प्रत्येक गावासाठी एक ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे.ग्रामपंचायत ही ग्रामसभेची कार्यकारी समिती आहे. ग्रामपंचायत हा पचायत राज संस्थांचा पाया आहे.
२) मुबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ राज्यात १ जून १९५९ पासून लागू झाला.
ग्रामपंचायत बद्दल संपूर्ण माहिती
• ग्रामपंचायतीची रचना : ग्रामपंचायत गावात स्थापन होण्यासाठी त्या संबंधित खेड्याची लोकसंख्या किमान ६०० असावी लागते. जर एखाद्या खेड्याची लोकसंख्या ६०० पेक्षा कमी असेल तर तेथे दोन-तीन खेड्यांची मिळून ‘ग्रुप ग्रामपंचायत’ बनते. डोंगरी भागात ग्रामपंचायत स्थापन होण्यासाठी गावची लोकसंख्या किमान ३०० असावी लागते.
• ग्रामपंचायतीची कार्यकाल : ग्रामपंचायतीची कार्यकाल सर्वसाधारण स्थितीत ५ वर्षे (ग्रामपंचायतीच्या पहिल्या सभेपासून गणना) असतो.
राज्य शासन अपवादात्मक परिस्थितीत हा कार्यकाल एक किंवा सर्व ग्रामपंचायतींबाबतीत कमी-अधिक करू शकते. वाढीव कालावधी लक्षात घेता हा कार्यकाल साडेपाच वर्षांपेक्षा अधिक असू शकत नाही. ग्रामपंचायत सदस्य कार्यकाल 5 वर्ष इतका असतो परंतु त्यापूर्वी ते आपला राजीनामा देऊ शकतात. सरपंचाला राजीनामा द्यायचा असल्यास तो पंचायत समितीच्या सभापतीकडे देतो.उपसरपंच सरपंचाकडे देतो.
• ग्रामपंचायतीच्या सभासदांची पात्रता : ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची पात्रता तो भारताचा नागरिक असावा.त्याच बरोबर त्याला 21 वर्ष पूर्ण झालेली असावीत. त्यानंतर त्याचे गावच्या मतदान यादीत नाव असावे.
• ग्रामपंचायतीची सदस्यसंख्या : ग्रामपंचायतीची सदस्यसंख्या हि कमीत कमी (किमान) ७ व जास्तीत जास्त हि १७ असते.
गावची लोकसंख्या | सदस्यसंख्या |
६०० ते १५०० | ७ |
१५०१ ते ३००० | ९ |
३००१ ते ४५०० | ११ |
४५०१ ते ६००० | १३ |
६००१ ते ७५०० | १५ |
७५०१ हुन अधिक | १७ |
• निवडणूक पद्धती : ग्रामपंचायतीची निवडणूक राज्य निवडणूक आयोग घेते.ग्रामपंचायत निवडणूक प्रत्यक्ष, प्रौढ व गुप्त मतदान पद्धतीने होते. ग्रापंपांचायतीच्या निवडणुकीत १८ वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तीस मतदार गणले जाते, व त्यास मतदानाचा अधिकार प्राप्त होतो.
• आरक्षण : ग्रामपंचायतीची निवडणूक मध्ये काही जागा ह्या विशीष्ट प्रवर्गासाठी राखीव असतात.त्या खालीलप्रमाणे आहेत.
• महिलांसाठी : एकूण सदस्यसंख्येच्या ५०% जागा ह्या महिलांसाठी राखीव असतात
• अनुसूचित जाती-जमातींसाठी : संबंधित खेड्यातील एकूण लोकसंख्येशी असलेले अनुसूचित जाती-जमातींचे प्रमाण लक्षात घेऊन त्यांच्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून काही जागा राखीव ठेवल्या जातात.
• नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी : एकूण सदस्य संख्येच्या २७% जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव असतात.
ग्रामपंचायतीचे वॉर्ड तहसिलदार घोषित करतात.
महत्त्वाचे : महिलांसाठी ५०% जागा राखीव असल्याने अनुसूचित जाती-जमाती व मागास प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागांमध्येदेखील संबंधित प्रवर्गातील महिलांसाठी ५०% जागा राखीव ठेवल्या जातात.
• उमेदवारी : ग्रामपंचायत निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवाराने वयाची २१ वर्षे पूर्ण केलेली असावीत.
महत्त्वाचे : दोनपेक्षा अधिक अपत्ये असणाऱ्या उमेदवारांना आता ग्रामपंचायत (स्थानिक स्वराज्य संस्था) निवडणूक लढविता येत नाही.
• पदाधिकारी : सरपंच, उपसरपंच. • ग्रामपंचायतीच्या निवडून आलेल्या सदस्यांना पंच असे म्हणतात.
• पूर्वी पंच आपल्यापैकी एका सदस्याची सरपंच म्हणून व दुसऱ्याची उपसरपंच म्हणून निवड करत असत ३ जुलै २०१७ च्या निर्णयानुसार सरपंचांची निवड आता प्रत्यक्षरित्या थेट जनतेतून केली जाते. म्हणजेच सरपंचांची निवड प्रत्यक्षरित्या जनतेतून, तर उपसरपंचांची निवड अप्रत्यक्षरित्या पंचांकडून होते.