◆ स्वायत्त प्रादेशिक राज्ये (Autonomous Regional States)
● स्वायत्त प्रादेशिक राज्ये (Autonomous Regional States
● स्वायत्त प्रादेशिक राज्ये : – मुघल साम्राज्याचा ऱ्हास सुरू झाल्यानंतर अनेक स्थानिक व प्रादेशिक राजकीय व आर्थिक शक्तींचा उगम होत गेला. त्यामुळे १७ व्या शतकाच्या अखेरपासूनच भारतीय राजकारणात मोठे बदल होत गेले. १८ व्या शतकात मुघल साम्राज्याच्या अवशेषांवर अनेक स्वतंत्र व अर्ध-स्वतंत्र राज्ये निर्माण झाली.
● उदा :- बंगाल, अवध, हैद्राबाद, म्हैसूर आणि मराठा राज्य. याच सत्तांशी ब्रिटिशांना भारतात सर्वोच्चता प्राप्त करण्यासाठी संघर्ष करावा लागला.
● १८ व्या शतकातील राज्यांचे व्यापक स्तरावर तीन गटांमध्ये विभाजन केले जातेः
• १)पहिल्या गटात : बंगाल, अवध आणि हैद्राबाद सारखी काही राज्ये येतात जे पूर्वी मुघलांचे प्रांत होते. या राज्यांना ‘वारसा राज्ये’ (Succession States) असे म्हणता येईल, कारण त्यांचा उदय मुघलांच्या केंद्रीय सत्तेचा ऱ्हास होत गेल्याने प्रांतिक सुभेदारांनी स्वायत्तता घोषित केल्यामुळे झाला.
• २) दुसऱ्या गटात : मराठा, अफगाण, जाट, पंजाब यांसारखी राज्ये येतात ज्यांचा उदय स्थानिक सरदार, जमीनदार आणि शेतकऱ्यांनी मुघल सत्ता झुगारून दिल्यामुळे झाला.
• ३) तिसऱ्या गटात : अशी राज्ये येतात जी पूर्वीपासून मुघलांच्या शासनकाळात वतन जागिरींच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात स्वतंत्र होती. त्यांमध्ये अनेक राजपूत राज्यांचा समावेश होता.
● या तिन्ही प्रकारच्या राज्यांमधील राजकारण परस्परांपासून काही प्रमाणात भिन्न होते, तसेच स्थानिक परिस्थितींमधील भिन्नतेमुळे त्यांमध्ये काही फरकही होते. मात्र त्यांचा व्यापक राजकीय व
प्रशासकीय आराखडा जवळजवळ सारखाच होता. याव्यतिरिक्त देशात चौथ्या प्रकारचा प्रदेश होता, जेथे पूर्वीपासूनच मुघलांचा प्रभाव जवळजवळ नव्हताच. त्यामध्ये नैऋत्य व आग्नेय किनारपट्टी व पूर्वोत्तर भारताचा समावेश होता.
● १८ व्या शतकातील बहुतेक सर्व राज्यांच्या शासकांनी आपली स्थिती कायदेसंमत करून घेण्यासाठी मुघल बादशाहाची नाममात्र
सर्वोच्यता मान्य केली.
● या राज्यांच्या शासकांनी कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचा आणि सक्षम आर्थिक व प्रशासकीय संरचना प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.
● त्यांना कमी जास्त प्रमाणात स्थानिक अधिकारी व सरदार-जमीनदारांवर नियंत्रण ठेवण्यात यश मिळाले. मात्र साधारणतः सर्व राज्यांमध्ये राजकीय सत्तेचे
विकेंद्रीकरण झालेले होते, ज्यामध्ये स्थानिक सरदार, जहागीरदार व जमीनदार यांना मोठ्या प्रमाणात स्वायत्तता होती. त्यांच्या हातात बरीच आर्थिक व राजकीय सत्ता होती.
● मात्र यांपैकी कोणतेही राज्य १७ व्या शतकापासून सुरू झालेले आर्थिक संकट थोपवू शकले नाही. ही राज्ये मूलतः महसूल ,गोळा करणारी राज्ये होती. जहागीरदार व जमीनदारांची संख्या व राजकीय बळ वाढत गेले, मात्र शेतीच्या उत्पन्नावर नियंत्रण मिळविण्यासाठी त्यांचा परस्परांशी संघर्ष चालूच राहिला.
● दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांची स्थिती ढासळत गेली. जरी या राज्यांच्या अस्तित्वामुळे अंतर्गत व्यापार विस्कळीत होण्यापासून काही प्रमाणात वाचला व काहींनी परकीय व्यापार वाढविण्यासाठीही प्रयत्न केले तरी या राज्यांनी आपल्या राज्याचा मूलभूत
औद्योगिक व व्यापारी पाया बळकट करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही. त्यामुळेच बाह्य आक्रमणे थोपविणे त्यांना दीर्घ काळात शक्य झाले नाही.
● इंग्रजांनी फ्रेंचांचा पराभव केल्यांनतर त्यांनी आपले लक्ष याभारतीय राज्यांकडे वळविले. युक्तीने व नियोजनाने इंग्रजांनी त्यांना हरविले किंवा आपल्या नियंत्रणाखाली आणले.