ARTICLES | a,an,the – meaning in Marathi

ARTICLES | a,an,the – meaning in Marathi |English Grammar

● ARTICLES
a, an आणि the हे शब्द तुमच्यासाठी नवीन नाहीत. हे किती महत्त्वाचे शब्द आहेत तेही सांगण्याची गरज नाही. इंग्रजी शिकणारा ज्यांच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही असे हे शब्द आहेत.विचारांची अचूक देवाणघेवाण करण्यात यांची बऱ्याचदा महत्त्वाची भूमिका असते.एखाद्या उपपदाच्या ठिकाणी दुसरे उपपद वापरल्याने किंवा उपपद न वापरल्याने कधी अपेक्षित अर्थापेक्षा दुसराच अर्थ व्यक्त होऊ शकतो. जसे,
•I like French. मला फ्रेंच भाषा आवडते.
•I like the French. मला फ्रेंच लोक आवडतात.

● a, an, the च्या उपयोगात निष्णात होण्यासाठी a, an, the चे काही नियम वाचून घेणे पुरेसे नाही. a. an, the च्या उपयोगाची सवय व्हायला पाहिजे. त्यासाठी नियम लक्षात घेण्यासोबतच गरज आहे वाचनाची आणि शक्य तेव्हा इंग्रजी ऐकण्याची.
वाचन व श्रवण केल्यामुळे जे तुम्ही इथे शिकाल त्याची तुम्हाला हळूहळू सवय होईल,आणि सवय होण्याला दुसरा पर्याय नाही. कारण बोलताना आपण मधे थोडं थांबून a येईल की की the याचा विचार करू शकत नाही.
• वाचन केल्यामुळे a, an, the चा अचूक उपयोग करण्याची सवय व्हायला मदत होते. कारण वाचनात आपल्याला a, an, the हे शब्द शेकडो वेळा सापडतात – शेकडोच नव्हे तर हजारो वेळा सापडतात. आणि जेव्हा आपल्यासमोरून एकच गोष्ट शेकडो, हजारो वेळा जाते तेव्हा त्याची हळूहळू सवय होणारच .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

उपपदांचे प्रकार दोन आहेत. प्रकारांची नावे पुढीलप्रमाणे
१)The Indefinite Article अनिशिततादर्शक उपपद (a, an)
२) The Definite Article निश्चिततादर्शक उपपद (the)

The Indefinite Articles (a/an)

a/an चा उपयोग

१) ‘एक’ या शब्दावर जोर द्यायचा नसल्यास एक’ या अर्थाने one ऐवजी बहुधा a/an चा उपयोग केला जातो. जसे,
There was a king.
एक राजा होता.
There is a proverb.
एक म्हण आहे.
I will stay here for a week.
मी इथे एक आठवडा थांबेन.
An apple a day keeps the doctor away.
दररोज एक सफरचंद….
12 inches make a foot.
१२ इंचाचं एक फुट होतं.

• पण एक या शब्दावर जोर द्यायचा असेल – किंवा एक ही संख्या दुसऱ्या संख्येशी तुलना करण्यासाठी वापरलेली असेल तर तेव्हा एक या अर्थाने one चा उपयोग केला जातो.

पहा:
Can you give me one reason why you did this?
तू हे का केलं याचं एक तरी कारण तू सांगू शकतोस का?
I have two sons and one daughter.
मला दोन मुलं आणि एक मुलगी आहे.

• Why are you standing on one foot?
तू एका पायावर का उभा आहेस?

• Before 5 years, he owned one shop, now he has 15 shops.
पाच वर्षांपूर्वी त्याच्याकडे एक दुकान होतं, आता त्याच्याकडे १५ दुकानं आहेत.

२) a/an चा उपयोग एकवचनी संख्यावाचक नामासोबतच होतो.
उदा. a book, an apple, an egg, a car.

३) (स्वराने सुरू होणाऱ्या नव्हे तर) स्वरासारख्या उच्चाराने सुरू होणाऱ्या शब्दासोबत an वापरतात. असंच (व्यंजनाने सुरू होणाऱ्या नव्हे तर) व्यंजनासारख्या उच्चाराने सुरू होणाऱ्या शब्दासोबत a वापरतात.
पहा :
• egg आणि European हे दोन्ही शब्द e पासून (म्हणजे स्वरापासून) सुरू झाले आहेत. पण या दोघांमधे फरक आहे. जसं egg हा शब्द लहान ९ पासून सुरू झाला. European मोठ्या E पासून सुरू झाला. मात्र a/an च्या फरकाचा या लहान/मोठ्या शी संबंध नाही.

● egg आणि European या शब्दांच्या उच्चाराची सुरुवात पहा. या दोघांच्या उच्चाराचीसुरुवात वेगवेगळी आहे.
egg च्या उच्चाराची सुरुवात ‘ए’ पासून (म्हणजे स्वरापासून) होते.
European च्या उच्चाराची सुरुवात ‘यु’ (म्हणजे ‘य’) पासून (म्हणजे व्यंजनापासून) होते. म्हणून egg सोबत an व European सोबत a येईल.

● परत पहा orange आणि one-way-road या दोघांची सुरुवात o या स्वरापासून झाली असली तरी दोघांच्या उच्चाराची सुरुवात वेगवेगळी आहे. orange च्या उच्चाराची सुरुवात ‘आँ’ (म्हणजे ‘अ’) पासून – म्हणजे स्वरापासून होत आहे.

one-way-road च्या उच्चाराची सुरुवात ‘व’ पासून म्हणजे व्यंजनापासून होत आहे.म्हणून orange सोबत an a one-way-road सोबत a येईल.

आणखी एक अशीच जोडी पहा:- hour आणि horse.
या दोघांची सुरुवात दिसायला h या व्यंजनापासून झाली आहे. पण उच्चाराची सुरुवात वेगवेगळी आहे. hour चा उच्चार ‘अ’ व horse चा उच्चार ‘ह’ पासून सुरू होतो. म्हणून hour सोबत an व horse सोबत a येईल.

पुन्हा एक शेवटची जोडी पहा :- M.A. व man.

● या दोघांची सुरुवात दिसायला m या व्यंजनापासून झाली. पण M.A. च्या उच्चाराची सुरवात ‘ए’ पासून म्हणजे स्वरापासून होते आणि man च्या उच्चाराची सुरुवात ‘म’ म्हणजे व्यंजनापासून होते. म्हणून M.A. सोबत an व man सोबत a येईल.

४) ही एखाद्या गटाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एकवचनी संख्यावाचक नामासोबत a / an चा उपयोग केला जाऊ शकतो.
उदा. A teacher has to have a lot of patience.
शिक्षकाकडे (म्हणजे प्रत्येक शिक्षकाकडे, कोणत्याही शिक्षकाकडे) संयम असावा लागतो.

५) साधारणपणे a / an चा उपयोग एकवचनी संख्यावाचक नामासोबतच होतो. पण एखाद्या वेळेस एखाद्या संख्यावाचक नसलेल्या नामाच्या अर्थाला मर्यादित करायचे असल्यास, संख्यावाचक
नसलेल्या नामासोबत सुद्धा a/ an चा उपयोग केला जाऊ शकतो.
उदा. There was a fierceness in his eyes.
त्याच्या डोळ्यामधे एक/एक प्रकारचा क्रूरपणा होता.

• आणखी काही संख्यावाचक नसलेल्या नामांसोबतही a/an चा उपयोग केला जाऊ शकतो. विशेषत: जेव्हा त्यांच्यासोबत विशेषण असते. जसे,
a good knowledge of English.
a slight difference

काही क्रियेच्या नावांसोबत सुद्धा a / an चा उपयोग केला जाऊ शकतो. उदा. Have a try. Have a think. Take a look at this.

६) विशेषतः खाण्यापिण्याच्या काही वस्तूंच्या नावांसोबत a / an चा उपयोग ती वस्तू ज्यात वाढतात ते भांडे किंवा त्या वस्तूचे ठरावीक माप या अर्थाने केला जातो.
उदा : a tea, a coffee, an icecream

८) एक गट किंवा एक संच या दृष्टीने दोन नाम वापरले गेले तर त्यातील फक्त पहिल्या नामासोबत a/an वापरावे.
उदा : a cup and saucer.

९) एखाद्या व्यक्तीच्या आडनावासोबत a चा उपयोग बोलणारा त्या व्यक्तीला ओळखत नाही असे दर्शवतो.
उदा: A Mr Patil wants to see you.

१०) a/an चा उपयोग दर/प्रत्येक या अर्थाने सुद्धा केला जातो.
उदा: १)once a week,
२)thrice a year,३) 60 kms an hour ,४) Rs. 20/- a kilo
११) Half या शब्दापूर्वी पूर्ण संख्या असल्यास half सोबत a वापरावे.
उदा. one and a half kilos
three and a half litres.
पण फक्त अर्धा किलो’ म्हणायचे असल्यास half a kilo म्हणावे (a half kilo नाही).

The Definite Article (the)

The Definite Article (the)
the चा उपयोग

१) आधी उल्लेख झाल्यामुळे किंवा परिस्थितीमुळे एखादे सामान्य नाम निश्चित/ठरावीक झालेले असल्यास म्हणजे कोणाबद्दल किंवा कशाबद्दल बोलले जात आहे ते वाचणाऱ्या किंवा ऐकणाऱ्यासमोर स्पष्ट असल्यास तेव्हा त्या नामासोबत the वापरावे. जसे,

• Please close the door. (असे दारावर लिहिलेले असताना कोणत्या दाराबद्दल बोलले जात आहे ते समजायला उशीर लागत नाही.)

• I will drop you at the station. (‘स्टेशन’ गावात एकच असल्यामुळे किंवा कोणतं स्टेशन ते स्पष्ट असल्यामुळे the आलं.)

• I am going to the bank to deposit some money. (इथे bank सोबत the आलं कारण आता ही कुठलीही bank राहिली नाही. आपली नेहमीचीच, म्हणून निश्चित बँक आहे.)

The phone is ringing.
(‘फोन’ सोबत the आलं कारण कोणता फोन ते परिस्थितीनुसार स्पष्ट आहे.)

• Once upon a time, here lived a king, the king was very generous and brave. (ज्या king सोबत the आलं त्याचा उल्लेख दुसऱ्या वेळेस झाला. दुसऱ्या वेळेस उल्लेख झाल्यामुळे दुसरा king निश्चित झाला.)

• I am talking about the boy we met yesterday. (कोणत्या मुलाबद्दल बोललं जात आहे ते लगेच स्पष्ट केलेलं असल्यामुळे boy सोबत the चा उपयोग झाला)

२) एखाद्या विशिष्ट, ठरावीक व्यक्ती किंवा वस्तूबद्दल बोलताना ज्याप्रमाणे आपण the वापरतो त्याप्रमाणे याउलट परिस्थितीमधे जेव्हा एखाद्या नामाचा पहिल्यांदाच उल्लेख होत असतो किंवा ते नाम एखादी विशिष्ट व्यक्ती किंवा वस्तू दर्शवत नाही तेव्हा त्या एकवचनी संख्यावाचक नामासोबत a/an वापरतात.
उदा : I ate an apple.
I read this in a newspaper. They are building a house.

३) विशेषणाच्या superlative रूपासोबत the वापरतात.
उदा. the best book; the longest river.

४) only, same, following, next, first, last, main, sole a ultimate या विशेषणांसोबत बऱ्याचदा the हे उपपद येते.
उदा. the only way
the next thing the first time
the sole owner the ultimate reality.

५) काही विशेषणांपूर्वी the वापरून त्यांना नाम करता येते, ज्यातून तशा प्रकारच्या सर्व लोकांचा गट असा अर्थ व्यक्त होतो.
उदा. the educated (सुशिक्षित लोक)
the rich (श्रीमंत लोक)
the French (फ्रेन्च लोक)
the weak (अशक्त लोक)

६) एखाद्या वस्तूच्या अगर प्राण्याच्या नावासोबत the वापरून त्या जातीचे सर्व प्राणी अगर त्या प्रकारच्या सर्व वस्तू असा अर्थ त्यातून व्यक्त करता येतो.
उदा. The dog is a faithful animal.
The car is responsible for a lot of pollution around us.

७) ग्रंथाच्या नावासोबत the वापरतात. पण ग्रंथाच्या नावासोबत लेखकाचे नाव असल्यास तेव्हा the वापरत नाहीत.
उदा. The Ramayana परंतु walmiki’s Ramayana – the Walmiki’s Ramayana नाही.

८) आडनावाचे अनेकवचन करून त्यासोबत the वापरल्यास ते आडनाव असलेले जोडपे किंवा कुटुंब असा त्याचा अर्थ होतो.
उदा. The Patils = श्री पाटील व त्यांची पत्नी (आणि मुले वगैरे).

९) दशक, शतक आणि ऐतिहासिक कालखंडाच्या नावांसोबत the वापरतात.
उदा. This fashion started in the 1950s.
Things were very different in the 70s.
The Stone Age: The eighteenth century.

१०) My, your, his इ. शब्दांच्या ठिकाणी खालीलप्रमाणे कथीकधी the चा उपयोग केला जाऊ शकतो.
उदा. He has a pain in the chest. (= his chest). He hit me in the stomach. (= my stomach).
Please come to our house with the family. (= your family).

११) विशेषणाच्या (किंवा क्रियाविशेषणाच्या) comparative रूपासोबत सहसा उपपद येत नाही. पण comparative रूपाचा उपयोग पुढीलप्रमाणे वाक्यात दोनदा झाल्यास the चा उपयोग केला जातो.

उदा. The less said about this, the better.
याबद्दल जितकं कमी सांगितलं तितकं चांगलं.
The more you know about some famous people, the less you like them.
काही प्रसिद्ध लोकांबद्दल तुम्हाला जितकं जास्त कळत जातं ते लोक
तुम्हाला तितके कमी आवडतात.
The sooner we leave, the sooner we will get there.
जेवढ्या लवकर आपण निघणार आपण तिथे पोहोचणार.

१२) एखाद्या सामान्य नामासोबत the चा उपयोग करून त्या सामान्य नामाला भाववाचक बनवता येते.
उदा. And the warrior in him was aroused.
आणि त्याच्यामधील योद्धा जागृत झाला.

१३) आपल्या प्रकारच्या ‘एकमेव’ असलेल्या गोष्टीच्या नावासोबत the वापरतात.
उदा.The moon, the sun, the world, the universe, the sky.

१४) शेवटी -ss, -ch, -ese किंवा -sh असलेल्या राष्ट्रीयता दर्शवणाऱ्या विशेषणांसोबत the वापरून त्यातून त्या राष्ट्राचे लोक’ असा अर्थ व्यक्त करता येतो.
उदा. The Spanish, the Japanese, the Dutch, The Swiss.
ही अक्षरे शेवटी नसलेल्या राष्ट्रीयता दर्शवणाऱ्या शब्दांचे अनेकवचन करून सोबत the वापरून किंवा न वापरता हाच अर्थ व्यक्त करता येतो.
उदा. (the) Americans, (the) Indians.

१५) काही विशेषणांसोबत the वापरून त्याचा उपयोग नामासारखा करता येतो. तेव्हा the चा अर्थ ‘गोष्ट’ अशा प्रकारचा निघतो. जसे,
unexpected=अनपेक्षित,
the unexpected = अनपेक्षित गोष्ट.
The unexpected happened.
अनपेक्षित गोष्ट घडली. You are asking me to do the impossible.
तू मला अशक्य गोष्ट करायला सांगत आहेस.

१६) एखाद्या राज्यकर्त्याच्या नावानंतर त्या राज्यकर्त्याचे वर्णन करणारा शब्द असल्यास त्या शब्दासोबत the वापरतात.
उदा. Alexander the Great. Hitler the tyrant. William the conqueror.

१७) द्वीपसमूह, पर्वतरांग, भौगोलिक प्रदेश, वाळवंट, नदी, कालवा, समुद्र, महासागर, हॉटेल, वस्तुसंग्रहालय, प्रसिद्ध संस्था, संघटना अगर राजकीय पक्ष आणि इंग्रजी वृत्तपत्र यांच्या नावासोबत the वापरतात.
उदा. the British Isles, the Himalayas, the Far East, the Middle East, the Sahara, the Nile, (नदीच्या नावासोबत river हा शब्द वापरला जाऊ शकतो, जसे the River Godavari)
the Suez Canal,the Arabian Sea ,the Pacific Ocean,
the Taj ,the Hilton ,the British Museum,the Labour Party the BBC the Washington Post
टीप :- एखाद्या संस्थेचे संक्षिप्त रूप शब्दाप्रमाणे वाचले जात असल्यास त्यासोबत
उपपद येत नाही. उदा. NATO (नेटो), UNICEF (युनिसेफ).

१८) Twice, double, three times, वगैरे व one-third, two-thirds वगैरे व all, both आणि half या शब्दांनंतर the चा उपयोग केला जाऊ शकतो.
उदा. all the people; all the information; both the buildings; both
the boys; half the regular size; two thirds the required amount of money; You have bought it for twice the price.all, both आणि half नंतर of सुद्धा वापरता येईल.
all the books = all of the books.
both the shops = both of the shops. .
half the time = half of the time
all आणि both हे शब्द the शिवाय सरळ नामासोबतही वापरले जाऊ शकतात.
जसे, both hands; all things .

१९) खालील वाक्ये पहा:A dog is barking. He is an engineer. He is writing a letter.
एखाद्या नामासोबत the वापरण्याची गरज असेल तर आपण (अर्थातच) the वापरणार.
पण एखाद्या एकवचनी संख्यावाचक नामासोबत the वापरण्याचे काही कारण नसेल आणि a/ an वापरले नाही तरी वाक्याचा अर्थ निघत असेल तरीपण a/an वापरावे.

ARTICLES | a,an,the – meaning in Marathi |English Grammar

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा