उभयान्वयी अव्यये
उभयान्वयी अव्यय हा अव्ययांचा तिसरा प्रकार होय. अव्ययांचा अभ्यास करताना आपण यापूर्वी
क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय यांचा अभ्यास केला. आता आपण उभयान्वयी अव्ययांचा अभ्यास करू या.
पुढील वाक्ये पाहा.
(१) आईने मंडईतून कांदे व बटाटे आणले.
(२) मी शाळेच्या इमारतीत पाऊल टाकले आणि पावसाला सुरुवात झाली.
(३) शिक्षणात त्याचे विशेष लक्ष नसे, पण व्यायामाची त्याला चांगली आवड होती.
(४) शिरीष दंगा करतो, म्हणून शेवटी मार खातो.
● वरील वाक्यांपैकी पहिल्या वाक्यात ‘व’ हा शब्द ‘बटाटे’ नि ‘कांदे’ या शब्दांना जोडण्याचे काम
करतो. पुढील वाक्यांतील ‘आणि, पण, म्हणून’ हे शब्द दोन वाक्यांना जोडण्याचे काम करतात. अशा त-हेने
दोन किंवा अधिक शब्द, अथवा दोन किंवा अधिक वाक्ये यांना जोडणान्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यये असे म्हणतात. (‘उभय’ म्हणजे दोन, तर अन्वय’ म्हणजे संबंध असा या शब्दाचा अर्थ आहे.)
(उभयान्वयी अव्ययांचे प्रमुख कार्य म्हणजे दोन शब्द किंवा वाक्ये यांना जोडणे आहे. ती अव्यये असतात. वाक्यात इतर कोणतेही कार्य ती करत नाहीत. काही शब्द दोन वाक्ये जोडण्याचे काम करतात.
उदा. जो-जी-जे-ज्या ही सर्वनामे जसा-तसा, जितका-तितका ही संबंधी विशेषणे दोन वाक्यांना जोडतात.पण ती विकारी आहेत; ती अव्यये नाहीत. जिथे-तिथे, जेव्हा-तेव्हा यांसारखी संबंधी क्रियाविशेषणे दोन वाक्ये जोडण्याचे कार्य करतात; पण त्यांचे प्रमुख कार्य क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगण्याचे असते.म्हणून त्यांना उभयान्वयी अव्यये म्हणता येणार नाही.)
उभयान्वयी अव्ययांचे प्रकार
उभयान्वयी अव्ययांचे दोन मुख्य प्रकार आहेत :
(१) प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यये
(२) गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यये.
● उभयान्वयी अव्ययांनी जोडली गेलेली वाक्ये स्वतंत्र किंवा एकमेकांवर अवलंबून नसणारी म्हणजे ती सारख्या दर्जाची असतील, तर अशा प्रकारच्या उभयान्वयी अव्ययांना प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात. पण हीच अव्यये जेव्हा एक प्रधान वाक्य व दुसरे गौण वाक्य (म्हणजे अर्थाच्या दृष्टीने प्रधान वाक्यावर अवलंबून असलेले वाक्य) असेल, तर अशी असमान दर्जाची वाक्ये जोडतात, तेव्हा त्यांना गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात.
प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययांचे पोटप्रकार
(१) समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यये
पुढील वाक्ये पहा.
(१) विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. (२) आता संध्याकाळ होत आली होती आणि आईला घरची ओढ लागली होती.
(३) पिलाने घरट्याबाहेर मान काढली व किलबिलाट केला.
(४) भिकाऱ्याला मी एक सदरा दिला; शिवाय त्याला जेवू घातले.
● वरीत वाक्यांतील आणि, व, शिवाय’ यांसारखी उभयान्वयी अव्यये दोन प्रधान वाक्यांना जोडताना
यांचा मिलाफ किंवा समुच्चय (समुच्चय म्हणजे बेरीज) करतात. ही अव्यये पहिल्या विधानात अधिक भर घालतात, म्हणून अशा उभयान्वयी अव्ययांना समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
‘अन्, आणखी, आणि, आणिक, न्, नि, व’ ही या प्रकारांतील अव्यये आहेत.
(२) विकल्पबोधक उभयान्वयी अव्यये
पुढील वाक्ये वाचा.
(१) देह जावो अथवा राहो। पांडुरंगी दृढ भावो।।
(२) पाऊस पडो वा न पडो, तुला आज गावी गेलेच पाहिजे.
(३) तुला ज्ञान हवे की धन हवे?
(४) तू ये किंवा न ये, मी जाणारच.
● वरील वाक्यांतील ‘अथवा, वा, की, किंवा’ ही उभयान्वयी अव्यये दोन किंवा अनेक गोष्टींपैकी एका गोष्टीची अपेक्षा दाखवितात. म्हणजे ती ‘हे किंवा ते’ ‘कोणते तरी एक’ असा अर्थ सुचवितात. अशा
उभयान्वयी अव्ययांना विकल्पबोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात. (विकल्प म्हणजे दोहोंतील एकाची निवड)
अगर, अथवा, किंवा, की, वा’ ही अव्यये विकल्पबोधक उभयान्वयी अव्यये आहेत.
(३) न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यये
पुढील वाक्ये वाचा.
(१) शेतकन्यांनी शेते नांगरली; पण पाऊस पडलाच नाही.
(२) पुष्कळ मुले उत्तीर्ण झाली; परंतु पहिल्या वर्गात कोणीच आले नाही.
(३) मरावे परी कीर्तिरूपे उरावे ।
(४) आईला थोडे बरे नाही, बाकी सर्व ठीक.
● वरील वाक्यांतील ‘पण, परंतु, परी, बाकी’ ही अव्यये पहिल्या वाक्यातील काही उणीव, कमीपणा,
दोष असल्याचे दाखवितात. अशा अव्ययांना न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यये म्हणतात. (न्यूनत्व म्हणजे कमीपणा.) ही अव्यये दोन वाक्यांतील विरोध दाखवितात म्हणून त्यांना विरोधदर्शक असेही म्हणतात.’किंवा, पण, परंतु, बाकी, तरी’ ही अव्ययेन्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यये आहेत.
(४) परिणामबोधक उभयान्वयी अव्यये
(१) मधूने उत्तम भाषण केले; म्हणून त्याला बक्षीस मिळाले.
(२) सायकल वाटेत नादुरुस्त झाली; सबब मला उशीर झाला.
(३) तुम्ही त्याचा अपमान केला; याकरिता तो तुमच्याकडे येत नाही.
● वरील वाक्यांतील ‘म्हणून, सबब, याकरिता’ ही अव्यये पहिल्या वाक्यात जे घडले त्याचा परिणाम
पुढील वाक्यात सुचवितात, म्हणून अशांना परिणामबोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात.
‘अतएव, तस्मात, त्यामुळे, म्हणून, यास्तव, सबब’ ही या प्रकारची अव्यये आहेत.
आता आपण गौणत्वदर्शक उभयान्वयी अव्ययांचे प्रकार पाहू या.
(१) स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यये
पुढील वाक्ये पाहा.
(१) एक रुपया म्हणजे शंभर पैसे.
(२) तो म्हणाला, की मी हरलो.
(३) दशरथ म्हणून एक राजा होऊन गेला.
(४) विनंती अर्ज ऐसा जे –
● वरील वाक्यांतील ‘म्हणजे, की, म्हणून, जे’ या उभयान्वयी अव्ययांनी दोन शब्दांचा किंवा वाक्यांचा संबंध जोडलेला आहे. तसेच या अव्ययांनी मागील शब्दाचे किंवा वाक्याचे स्वरूप उलगडून सांगितलेले असते. ज्या उभयान्वयी अव्ययांमुळे प्रधान वाक्याचे स्वरूप किंवा खुलासा गौण वाक्याने कळतो त्यांस स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात.
(२) कारणबोधक उभयान्वयी अव्यये
पुढील वाक्ये पाहा.
(१) त्याला बढ़ती मिळाली, कारण त्याने चोख कामगिरी बजावली.
(२) आम्हांला हेच कापड आवडते, का की ते आपल्या देशात तयार झाले आहे.
● वरील वाक्यातील ‘कारण, का की’ ही उभयान्वयी अव्यये एक प्रधानवाक्य व एक गौणवाक्य यांना जोडतात. यातील दुसरे गौणवाक्य हे पहिल्या प्रधान वाक्याचे कारण आहे. कारण का, की, कारण की, की
अशा प्रकारच्या कारण दाखविणाऱ्या अव्ययांना कारणबोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात.
(३) उद्देशबोधक उभयान्वयी अव्यये
पुढील वाक्ये पाहा.
(१) चांगला औषधोपचार लाभावा म्हणून तो मुंबईस गेला.
(२) विजेतेपद मिळावे यास्तव त्यांनी खूप प्रयत्न केले.
म्हणून, सबब, यास्तव, कारण, की’ यासारख्या अव्ययांनी जेव्हा गौण वाक्य हे प्रधानवाक्याचा उद्देश किंवा हेतू आहे असे दर्शविले जाते, तेव्हा त्यास उद्देशबोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात.
(४) संकेतबोधक उभयान्वयी अव्यये
पुढील वाक्ये पाहा.
(१) जर शाळेस सुट्टी मिळाली, तर मी तुमच्याकडे येईन.
(२) जरी त्याला समजावून सांगितले, तरी त्याने ऐकले नाही.
(३) तू लवकर घरी आलास, म्हणजे आपण बागेत जाऊ. (
(४) तू माझ्याकडे आलास, की मी येईन.
(५) प्रयत्न केला, तर फायदाच होईल.
● जर-तर, जरी-तरी, म्हणजे, की, तर या उभयान्वयी अव्ययांमुळे पहिल्या वाक्यातील अटीवर दुसन्या
वाक्यातील गोष्ट अवलंबून असते. ‘जर’ने अट दाखविली जाते आणि ‘तर’ने त्याचा परिणाम दर्शविला जातो.
जरीने अट दाखविली जाते आणि तरी’ने अनपेक्षित किंवा विरुद्ध असे कार्य दर्शविले जाते. अशा वेळी
सामान्यतः पहिले वाक्य गीण व दुसरे प्रधान असते. ही अव्यये संकेत किंवा अट दाखवितात. अशा अव्ययांना
संकेतबोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात.
एकच अव्यय, प्रकार मात्र वेगळे
उभयान्वयी अव्ययांच्या एकंदर आठ प्रकारात एकच अव्यय पुनःपुन्हा आलेले दिसेल. याचा अर्थ त्या वाक्यात त्याचे कार्य वेगळे आहे. उदा .
(१) यश मिळो की न मिळो आम्ही प्रयत्न करणार, (विकल्पबोधक)
(२) लो, टिळक म्हणत, की ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे.’ (स्वरूपदर्शक)
(३) तो इतका खेळला, की त्याचे अंग दुखू लागले. (परिणामबोधक)
(४) माझा पहिला क्रमांक आला, की मी पेढे वाटीन, (संकेतबोधक)
वरील वाक्यांवरून ‘की’ हे अव्यय वरील वेगवेगळ्या चार प्रकारांत संभवते.
वाक्यातील त्याचे कार्य लक्षात घेऊन त्याचा प्रकार ठरवायचा असतो.